The Great Sculptor of Mahanubhav Dharma Part:-36

!!! जय श्रीकृष्ण !!!

!! महानुभाव पंथाचे थोर शिल्पकार !!

भाग:-३६

‘उपाध्ये आम्नायाचे मुळ पुरुष:- जानो उपाध्ये बळेगावकर’.

‘महाक्षेत्र पंचाळेश्वराच्या वायव्य दिशेला गंगेच्या उत्तर काठावर वसलेले ‘बळेगाव’ हे लहानसे खेडे आहे हे गाव प्राचीन कालातील मांडव्य ऋषीचे अश्रम स्थान होय, या ऋषीची कथा स्वत:हा स्वामी श्रीचक्रधर भगवंतानी बळेगांवी असतांना आपल्या भक्तजनाना सांगितली.

याच बळेगावी जनार्दन उपाध्ये ( जानो उपाध्ये) यांचा जन्म शके ११५५ मध्ये कमळनायक व गंगाबाई या पुण्यवंत दाम्पत्याच्या पोटी झाला. जनार्दनपंताना दोन भाऊ होते. वडील बंधु नागदेव उपाध्ये आणि त्यांच्यापेक्षा धाकटे बंधु पुरुषोत्तम उपाध्ये. पुरुषोत्तम उपाध्ये मूळ नक्षत्रावर जन्मले म्हणून त्यांना पिता कमळनायकाने आपले चुलत बंधू करंडे रामदेव यांच्याकडे पालन पोषणासाठी ठेवले. करंडे रामदेव हे उस्माना बाद जिल्ह्यातील कळंब या तालुक्याच्या गावाजवळ ‘पानाचे येवदे’ येथे रहात असत. पुरुषोत्तम देव लहान चे मोठे आपल्या चुलत्याजवळच झाले. पुढे कालांतराने करंडे रामदेव आणि जोमाईसा हे दोघे पति पत्नी नवगावी श्रीनागदेवाचार्यां जवळ आले व त्यांनी या पंथाची संन्यास दीक्षा घेतली.

‘पुरुषोत्तम उपाध्ये मोठे झाल्यावर आपल्या गावी बळेग्राम ला येऊन राहिले. पुढे त्यांचा विवाह होऊन त्यांना एक मुलगी झाली तिचे नांव कमळाऊसा हे होय. याच कमळाऊसेला जानो उपाध्यांनी आचार्याच्या जवळ आणून त्यांच्या नावे संन्यास दिली.व पुढे त्या उपाध्ये आम्नायाच्या आचार्य पदी रुढ झाल्या.

‘जनार्दन उर्फ जानो उपाध्ये यांनी गृहस्थाश्रमात असताना संस्कृतचा अभ्यास केला होता. ते वेदाभ्यासी होते, तसेच ते धार्मिक, श्रध्दावंत, आणि भाविक स्वभावाचे असल्यामुळे देवाधर्मावर व साधूसंतावर त्यांची पूज्य, भावना व दृढ श्रध्दा होती. म्हणूनच ते साधूसंतांच्या व देवाधर्माच्या कथा आपसात सांगत असत, आणि त्या कथा सांगते वेळी ते अगदी तल्लीन होऊन जात त्यामुळे त्यांना बळेग्रामच्या ग्रामस्थांमध्ये एक माननीय शास्त्री पंडित म्हणून मान्यता होती. त्याच गावातील सारंगपाणीभट, चांगदेवभट, एकदा पैठणला गेले असताना तेथे त्यांना स्वामी श्री चक्रधराचे दर्शन झाले. या दर्शनाने चांगदेवभटाला स्वामी विषयी अत्यंत भक्तिमय श्रध्दा उत्पन्न झाली मग ते परत बळेगावी आले, आल्यावर चांगदेवाने जानो उपाध्यांना स्वामीच्या अलैकिक गुणांची व मूर्ति सौंदर्याची योग्य ती माहिती देऊन ते ईश्वरीय पुरुष आहेत असे सांगितले. तेव्हा जानो उपाध्यांना ते पुरुष कसे आहेत हे पाहावे अशी आकांक्षा निर्माण झाली. जानो उपाध्ये चागदेवभटला म्हणाले,

“आपण दोघे मिळून पैठणला जावूया”

मग ते एके दिवशी दोघे मिळून स्वामींच्या दर्शनासाठी पैठणला गेले. त्यावेळी स्वामी भक्तीजनांना धर्म निरूपण करीत होते. जानो उपाध्यांनी स्वामीना नमस्कार केला आणि निरोपण श्रवणार्थ जन- स्थिती प्रमाणे पुढ्यात बसले. स्वामीचे निरूपण समाप्त झाल्यावर उपाध्यांनी बाइसांकडून एक फूल व अक्षता मागितल्या आणि ‘सहस्त्रशिर्षा पुरुषा ! हा वेद मंत्र उच्चारून स्वामींची फूल व अक्षता वाहून पूजा केली. या ज्ञानमय श्रध्देचा व भक्ति प्रेमाचा जानोपाध्यांच्या अंतरी अभेद असा भाव निर्माण झाला तरी पण स्वामी श्रीचक्रधर हे कोण आहेत या विषयी थोडी शंका त्यांच्या मनात राहिलीच !

‘एके दिवशी स्वामी श्रीचक्रधर पैठण येथील हरिदेव पंडितांना आगमातील गोपाळ मंत्राची संख्या सांगत होते. त्यावेळी उपाध्यबास मनःपूर्वक ऐकत बसले. तेव्हा स्वामी म्हणाले, ‘या गोपाळ मंत्राचे शतसहस्त्र भेद असती ! या भेदापैकी एक भेद कोणीच जाणत नाही. केवळ श्रीकृष्ण रूक्मिणीला किंवा आम्हाला माहित आहे.’ हे ऐकून जानोपाध्यांना असा बोध झाला की, स्वामी हे साक्षात भगवान श्रीकृष्णाचे अवतार आहेत. या उपरांत उपाध्यांची स्वामी विषयी दृढ श्रध्दा झाली. यानंतर ते वापस आपल्या गावी गेले. स्वामीचे दर्शन झाल्यापासून त्यांना स्वामी श्रीचक्रधरां विषयी अत्यंत आस्ता आणि प्रेम निर्माण झाले.

स्वामींचा मुक्काम एळापूरला (वेरुळ) आहे असे समजताच ते वेरुळला स्वामींच्या भेटीस गेले. पश्चात प्रहरी ते वेरूळ ला पोहोचले, त्यावेळी स्वामी चर्तुविधाच्या मठात होते. स्वामी ज्या ठिकाणी बसले होते तेथे अंधार होता ! उपाध्ये बाहेरून मठात आले तेव्हा अंधार असल्याने त्यांना स्वामींच्या श्रीमुर्तीचे दर्शन होईना. हे पाहून जानो उपाध्यांनी मनात दिव्याच्या प्रकाशाची अपेक्षा केली. तोच स्वामींच्या श्रीमूर्तितून प्रकाश निघाला आणि त्याना स्वामींचे यथायोग्य दर्शन झाले. स्वामी म्हणाले,

“बटीका ! परमेश्वर काइ अन्य प्रकाशु:”

‘म्हणजेच परमेश्वर काही अन्य साधनाने प्रकाशित होणारा आहे का ? नाही! तो स्वयंप्रकाशित आहे.” हे स्वामींचे वाक्य केवळ उपदेशपर नसून वास्तविकतेचे प्रत्यक्ष स्वरूप असल्यामुळे जानो उपाध्यांना पूर्वी स्तवन केलेल्या वेद मंत्राची आठवण झाली आणि स्वप्रकाशाने मूर्तिचे दर्शन देणाऱ्या ईश्वरीय गुणाचा साक्षात्कार होवून आनंद झाला. तेव्हापासून ते स्वामींचे अनन्य शिष्य झाले. त्यांना परमेश्वराविषयी बोध झाला.

‘जानो उपाध्ये हे विशिष्ट संस्काराचे आणि पुण्यशील असल्यामुळे त्यांच्यावर स्वामी अत्यंत प्रसन्न होते. एखाद्याचे ज्याच्यावर प्रेम असते त्यांच्यावर तो प्रसन्न असतो; आणि या प्रसन्नतेमुळे विनोदाच्या गोष्टीही घडत असतात, याप्रमाणेच स्वामीही उपाध्यांचा विनोद करीत असत. याच एळापूरात असताना उपाध्ये स्वतः भाकरी करीत होते, तेव्हा स्वामीं म्हणाले,
“तुम्ही अर्धी भाकर करा ! कारण तुम्ही अर्धी भाकर खाल ! ” उपाध्य म्हणाले,
‘जी अर्धी काई होईल!’
स्वामी म्हणाले,
‘तर काई पाऊण !
‘उपाध्य म्हणाले,
‘ना जी पाऊण काय होईल !’
स्वामी म्हणाले,
‘तर काई समग्र एक!
”ना जी समग्र एक काई होईल!’
‘तर काई सवाये !’
‘ना जी सवाय काई होईल!
‘ना दीढ! मी दीड भाकर खातो असे उपाध्ये म्हणाले. त्यावर स्वामींनी “तुम्हाला दीढ पुरुष म्हणावे लागेल.

जानो उपाध्ये हे स्वामींच्या भेटीला आल्यावर बाईसा सांगेल ते काम ते करीत असत म्हणून स्वामी त्यांना ‘बटिका’ या नावाने संबोधित असत. येळापूराहून जानो उपाध्ये वापस आपल्या गावी आले. त्यानंतर त्यांनी स्वामींची, पंचवटी नाशिक, बीड, पिंपळगाव, सेंदुर्णी, मिरेगांव खडकुली, डोमेग्राम, पैठण, जळगांव या ठिकाणी जाऊन भेट घेतली. या भेटीत स्वामींच्या सेवेचा त्यांनी पुण्य लाभ करून घेतला. याशिवाय ऋद्धिपुरला जाऊन श्रीगोविंद प्रभुंच्या दर्शनाचाही लाभ घेतला. हा लाभ स्वामी श्रीचक्रधरांनी त्यांना घडविला.

‘जानो उपाध्ये ज्यावेळी सेंदुर्णीला आले, त्यावेळी स्वामींनी श्री गोविद प्रभूंचे महत्त्व सांगून त्यांना ऋद्धिपुराला पाठविले. (पू. ली. क्र. २०२) ऋद्धिपुरला गेल्यानंतर त्यांना श्रीगोविंदप्रभूंची भेट झाली. श्रीगोविंदप्रभूंनी त्यांना आंब्याचा प्रसाद दिला. तो प्रसाद घेऊन ते परत स्वामींकडे आले. तेव्हा स्वामींचा मुक्काम आनवा येथे होता. त्यांनी आणलेला प्रसाद स्वामीं पुढे ठेवून नमस्कार केला. स्वामी म्हणाले, श्रीगोविंद प्रभू कोणत्या वेळेस कोणत्या जीवावर प्रसन्न होतील याचा नेम नाही. श्रीगोविंदप्रभू यांच्यावर प्रसन्न झाले म्हणून यांना आंब्याचा प्रसाद मिळाला. (पू. ली. क्र. २१६) अशाप्रकारे दोन्हीही अवतारी पुरुष त्यांच्यावर प्रसन्न होते.

‘नंतर जानो उपाध्ये आनवा येथे एक मुक्काम करून परत आपल्या गावी गेले. उपाध्ये जरी संसारी होते तरी त्यांना मुलबाळ झालेली नव्हती. तेव्हा संसाराचे ओझे त्यांच्यावर नव्हते. फक्त पति व पत्नी दोघेच असल्यामुळे ते संसाराच्या व्यापातून मुक्त असत. त्यात ईश्वर भक्तिकडे त्यांचा अधिक ओढा. हा दुहेरी संगम त्यांच्या जीवनात घडल्यामुळे मागे सांगितल्याप्रमाणे ते स्वामींची सतत भेट घेत असत. त्यातून त्यांना दुप्पट लाभ घडत असे. यातून त्यांचा दैवी संपत्तिचा वेल हा वाढतच होता आणि स्वामीही त्यांच्यावर सदैव प्रसन्न होते.

‘स्वामी ज्यावेळी महाराष्ट्रावर उदास झाले, त्यावेळी त्यांचा मुकाम जवळगावास होता. तेथून त्यांनी उपाध्याना व बळेगांवच्या महाजनाना बोलाविण्यास दाइंबाला पाठविले, त्यावेळी त्या गावातून फक्त उपाध्येच आले. उपाध्यांनी स्वामींचे दर्शन घेतले आणि स्वामींना एक वस्त्र (पासवडी) अर्पण करुन मनोभावे स्वामींची पुजा केली. यानंतर स्वामींनी उत्तरेकडे जाताना बळेगावास जाऊन उपाध्यांना भेट दिली.

‘उपाध्ये घरी असतांना ईश्वर चिंतनात आपला काळ घालवीत असत. स्वामींनी उत्तरापंथे गमन केल्या पासून त्यांचे संसारातुन मन निघाले. विरामता वाढली. गृहस्थाश्रमातील ऐश्वर्य व उपभोगांचा त्याग करुन संन्यास घ्यावा असे त्यांना वाटू लागले. असा विचार करीत असताना स्वामींच्या पश्चात् त्यांची बारा तेरा वर्षे अशीच निघून गेली. पण एके दिवशी ते घरून निघून ऋद्धिपुराला आले. तेथे श्री गोविंदप्रभू व श्रीनागदेवाचार्यादिकांची भेट झाली. तेथे असताना त्यांनी श्रीगोविंदप्रभू व श्रीनागदेवाचार्यादि भक्त मंडळीना भोजन दिले. व श्रीनागदेवाचार्यांच्या नावे शके १२०८ मध्ये संन्यास घेतला आणि आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. वस्तुतः ते श्रीचक्रधर स्वामींचेच शिष्य ! पण रीतीरिवाजांप्रमाणे त्यांनी आचार्यांच्या नावे संन्यास घेतला, त्यांनी संन्यास घेतला तेव्हा त्यांचे वय ५२ वर्षाचे होते.

‘उपाध्ये हे स्वामींचेच शिष्य ! अर्थात् श्रीनागदेवाचार्य आणि उपाध्ये बास हे दोघे गुरुबंधु होत. प्रथम उपाध्यांना बोध झाला व त्यानंतर श्रीनागदेवाचार्यांना झाला, आणि उपाध्य बास हे वयाने वडील म्हणून आचार्य हे उपाध्याना ‘दादो’ या नावाने आळवित असत. उपाध्ये हे संस्कृतचे पंडित होते परंतु त्यांच्याकडून एकही ग्रंथ निर्मिती झाली नाही. त्यांच्या जीवनातले कार्य म्हणजे त्यांनी स्वतः पुण्यलाभ करून घेतला आणि दुसऱ्यांनाही घडविला. एवढेच त्यांच्याकडून झाले.

‘उपाध्ये बास संन्यास घेतल्यानंतर एक वेळ बळेगावी गेले व नागदेव उपाध्यांचे पुत्र बाइदेवव्यास यास धर्मोपदेश करून त्यांना आचार्याच्याकडे घेऊन आले. आणि आचार्यांचे नावे बाइदेव बासास या पंथाची संन्यास दिक्षा दिली. तसेच पुरुषोत्तम उपाध्यांची मुलगी कमळाऊसा हिलाही आणून आचार्याच्या नांवे संन्यास दिक्षा दिली. अशाप्रकारे तिघेही पिता पुत्र आचार्यांच्या सानिध्यात राहू लागले. पुढे कालांतराने उपाध्ये बास शरीराने क्षीण झाले तेव्हा आचार्य म्हणाले, दादो तुम्ही रावसगावला रहा ! ” ही तुमची मुलगी तुम्हाला समर्पण करतो. ती तुमच्या सेवेत आयुष्यपर्यंत राहील. आचार्यांच्या आज्ञेवरून ते आपली पुतणी कमळाऊसा हिच्यासह रावस- गावला राहिले.

‘या ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, व वयोवृद्धाची सेवा कमळाऊसाने उत्तमप्रकारे केली. पण उपाध्य बास शरीराने हळू हळू क्षीण होत गेले आणि आजारी पडले. या आजारातच हा तपस्वी महात्मा, उपाध्ये शाखेचा मूळ पुरुष, शके १२२० मध्ये आपला पार्थिव देह सोडून निजधामास गेला. अंतसमयी त्यांचे वय ६५ वर्षाचे होते.

क्रमश:–

‘नमस्कार माझा या थोर महानुभावा…!!

परमार्ग सेवार्थ,

श्रीमद्भगवद्गीता धाम,,,,,प.से✍️,
सुभाष विश्वासराव पवार.
मो.नं. 9920653774
पिंपरी-चिंचवड,पुणे, महाराष्ट्र.

!!! जय श्रीचक्रधर !!!

 

The Great Sculptor of Mahanubhav Dharma