Aadarneey Punjneey Vandaneey Dnyanpunj Bhikshuk Mahant Shree Pradnyasagar Mahanubhav

*खणेपुरीची भूमी*
*।। महंत प्रज्ञासागरबाबांची तपोभूमी ।।*
————————–
*साधूचे जसे ईश्वराशी नाते असते तसेच जन्मभूमीशी व तपोभूमीशीही संबंध असतो. जन्मभूमीत रक्ताचे नाते संबंध, मोह मायेचा पसारा असतो. तर तपोभूमीत शारीर, मानसिक व वाचिक परिश्रमाने तप्त होऊन दीर्घ काळ ईश्वरीय ज्ञानसाधनेचा व भक्ती साधनेचा सुयोग असतो.*

*ब्रह्मविद्या शास्त्रात मनुष्याच्या ठाई असलेल्या 62500 हजार दोषांचे वर्णन आहे. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी म्हणतात “जीव सर्व दोषाचे आळे.” हे सर्व दोष तपोभूमीत जाळून टाकायचे असतात. मनुष्याला जन्मभूमी निवडायचे स्वातंत्र्य जरी नसले तरी तपोभूमी निवडायचे स्वातंत्र्य मात्र जरूर असते. तपोभूमी निवडणे हातात असते.*

*महंत प्रज्ञासागरबाबा यांनी तपोभूमी म्हणून खणेपुरीला निवडले आहे. खणेपुरी येथे श्रीचक्रधर स्वामींचे चरणांकित तीर्थस्थान आहे. परमेश्वराची माया शक्ती, क्रुपा शक्ती व प्रसन्नतेचा या तीर्थस्थानाचे ठाई निवास आहे. खणेपुरी येथे नामस्मरण आहे. ब्रह्मविद्या शास्त्र आहे. खणेपुरीचा हा परिसर सत्वगुणाची धर्मभूमी आहे. श्री दत्तात्रेय प्रभूच्या भीक्षा भोजणाची सामर्थ्यभूमी आहे. खणेपुरीचा हा 100/150 कि मी चा परिसर असतीपरी आचरणार्या साधकाची तपोभूमी आहे.*

*असतीपरीचा आचार करणार्या साधकाला मान सन्मान व विषय संपादन करून ईश्वर साधनेपासून विचलित करणारा समाज या परिसरात नाही. साधूच्या गुण दोषाकडे दुर्लक्ष करणारा समाज असल्यामुळे या परिसरात राहून असतीपरीचा आचार करणार्यांना समाजाचा अजिबात अडथळा येत नाही. म्हणूनच पूर्वीच्या काळी असतीपरी आचरणार्या साधकांचे मार्ग मेळे खणेपुरीपासून पांचाळेश्वर पर्यंतच्या 100 / 150 कि मी.च्या प्रदेशात चातुर्माशीला येत असत. खणेपुरी पासून रामसगाव, शहागड, पांचाळेश्वर पर्यंतचा हा परिसर असती परी आचरणार्या साधकांची तपोभूमी म्हणून मानल्या जाई. एकाकी देह क्षेपणार्या हजारो ज्ञात अज्ञात साधकांनी हा परिसर गजबजलेला. असंख्य साधकांनी या परिसरात आपला देह ठेवलेला व ईश्वर प्राप्त केलेला. नवगावला महदाईसा, राक्षस भूवनला नाथोबा,रामसगावला साधाईसा अशा कितीतरी असंख्य ज्ञात अज्ञात साधकांनी खणेपुरीच्या या परिसरात असतीपरीचा आचार करून पुन: संबंधाला प्राप्त केला. कपाटे नागराज व्यासांनी कपारीत बसून नामस्मरण केले. साक्षात श्री दत्तात्रेय प्रभूनी याच खणेपुरी पांचाळेश्वर च्या परिसरात फकिराच्या वेशात कपाटे नागराज व्यासांना दर्शन दिले. ते स्थळ खणेपूरी पासून हाकेच्या अंतरावर. शहागड येथे शहामूनींना स्वप्नात दर्शन देऊन सिद्धांत बोध ग्रंथ लिहिण्याचे वरदान दिले ते याच परिसरात. याच खणेपुरी परिसरातील रामसगावाहून श्री भट्टोबास, महदाईसा, आदी महान साधक पंथ कार्यात पुढे सरसावले. ज्ञानयज्ञ व नामस्मरण यज्ञ करून असतीपरीच्या यज्ञकुंडात आपला देह क्षेपण्यासाठी साधक देश भरातून खणेपूरी- रामसगाव- पांचाळेश्वर च्या परिसरात गंगातीराला येऊन राहात. शतकानुशतके महानुभावांनी या भूमीवर साधना केली आहे.*

*म्हणूनच प्रज्ञासागरबाबा महानुभाव यांनी स्वतःचे देहाचे (जन्म) गाव राठोडा ता.निलंगा जि.लातूर या अविद्यकाचा त्याग करून कै. आचार्य श्री शेवलीकर कल्लूरकर बाबांच्या सान्निध्यात वयाच्या 6 व्या वर्षी येऊन पुढे संन्यास स्वीकारानंतर वयाच्या 30 व्या वर्षी खणेपुरीला 1997 ला स्वेच्छेने खणेपुरी या तपोभूमीवर सेवा कार्याचा आरंभ केला आहे.*

*खणेपुरी येथे पित्रुदोष काळ सर्प इत्यादी ब्रह्मविद्या शास्त्रात वर्णिलेल्या साडे बासस्ट हजार दोषांच्या नाशाची संपन्न व सम्रुद्ध परंपरा पूर्वीपासूनच प्रचलित आहे. ब्रह्मविद्या ज्ञानाने हे दोष पूर्वीपासूनच येथे नाशतात. खणेपुरीच्या तीर्थस्थानाची श्रीमंती आहे. या तीर्थस्थानाचा हजारो श्रद्धावानांना अनुभव आला आहे. खणेपुरी येथे तीर्थस्थानाच्या दर्शनाने सुख शांती मिळते.मनोरथ पूर्ण होतात. कार्य यशस्वी होते. याचा आजही श्रद्धावानांना अनुभव येत आहे. सर्वांवर या तीर्थस्थानाची अशीच सदैव क्रुपा होवो हीच तीर्थस्थानाचे चरणी प्रार्थना.*

*108 कोटी नामस्मरण मंदिर*
*खणेपुरी, ता.जि.जालना*
*मो. 9850448501*

Leave a Comment