Modesty, Subservience and Benevolence of Sarvadnya Shri. Chakradhar Swami

नम्रतेने, लिनतेने व

सौजन्याने लोकांत धर्म प्रबोधन करणारे

सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी

 ——————————

         परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामी हे अनंत शक्तीने युक्त,आनंदाचे सागर,सर्व जीव देवतांचे मालक व ऐश्वर्य संपन्न असूनही स्वताचे ऐश्वर्य विसरून, लहानपणा घेत, या कर्मभूमी मध्ये मनुष्याची आकृती धारण करून साकार होत अवतार घेतला. मानवा कृती होऊन गरीब, दिन, दुबळे, आदीवासी लोकांमध्ये राहिले, त्यांची भाषा बोलले व ईश्वरीय धर्म लोकांना अत्यंत नम्रतेने, प्रेमाने व लीनतेने शिकविला. समर्थ असे परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अज्ञानी, कष्टकरी व दुखी लोकांमध्ये समरस झाले. वास्तविक त्यांना अशी नम्रता व लिनता स्वीकारण्याची व लहानपणा घेण्याची काहीच आवश्यकता नव्हती.

        परंतु अज्ञानी जीवांना मार्ग दाखविण्यासाठी स्वता: आचरण करून दाखविले व आपल्या भक्तांनीही अशीच नम्रता, लीनता व परमप्रितीचा मार्ग धरावा असे सांगितले आहे.

१. गवळी लोकांत गोपाल होऊन समरस होणारे भगवंत 

—————————–

भगवान श्रीकृष्ण गोकूळातील गवळी लोकांमध्ये मिसळले.‌ काठी व घोंगडे घेऊन गायी चारण्याचे काम केले. राजसूय यज्ञात पंगतीत वाढण्याचे काम केले. अर्जुनाचा रथ हाकण्याचे व घोडे धुण्याचे काम केले. परमेश्वराने ही नम्रता व लिनता लोकांना धर्म शिकवून त्यांचा उद्धार करण्यासाठी स्वीकारली. *धर्माचा प्रचार व प्रसार नम्रतेने, प्रेमाने व लिनतेनेच होत असतो.*

       हाच नम्रतेचा, लिनतेचा व परम प्रीतीचा मार्ग स्वीकारून महानुभाव पंथाने या महाराष्ट्रात व देशात धर्माचा प्रचार व प्रसार केला आहे. महानुभाव पंथाची ही महान परंपरा आहे.

२.नम्रता, लीनता व प्रेमळ आचरणाचे लीळाचरित्रात उदाहरण

—————————–

     महानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना बाईसाने दरवाज्यातील पाय पुसणे बसायला दिले. स्वामी त्या पाय पुसण्यावर बसले. नांदेड येथे एका ब्राह्मणाने श्रीचक्रधर स्वामींना गायी राखण्याचे काम सांगितले.‌ स्वामींनी ते काम अत्यंत नम्रतेने व लिनतेने स्वीकारले. एके गावी श्रीचक्रधर स्वामी चोरासोबत राहिले, दुसर्या एका गावी वेठबिगार म्हणून राहिले.‌ अशाच एका गरीब गुराख्याचा ज्वर स्वत: अंगावर घेऊन त्याचे झोपडीत राहिले. एका *धर्म संस्थापकाच्या ठाई असलेली ही नम्रता, लिनता व जन सामान्यां विषयीचा कळवळा आश्चर्य चकीत करणारी आहे.* लोकात वावरताना आपल्या भक्तांनी *डोई ओडवावी* असे श्रीचक्रधर स्वामी सांगतात. अहंकार शून्य होऊन अंगी विनम्रता धारण केली व प्रिय वक्ता बनले की त्यांचे सर्वत्र स्वागतच होईल यात शंकाच नाही. *धर्म प्रबोधकाच्या अंगी सदैव लीनता, नम्रता व डोई ओडवण्याची वृत्ती असणे फार गरजेचे आहे* असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे सांगणे होते. याच गुणांमुळे महानुभाव पंथ महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तरेला अटके पर्यंत विस्तारला. सर्वत्र महानुभावांचे स्वागतच झाले.अंगी नम्रता, लिनता, सहनशीलता, अपमान सहन करणे, व आपला साधनदाता परमेश्वर श्री चक्रधरांची सतत निष्ठेने आज्ञा प्रतिपालन करीत नामस्मरण करीत आयुष्य वेचने. याच गुणांमुळे महानुभाव पंथाचा देशभर प्रसार झाला…

३.घोडाचुडी संन्याशाची संगत नाकारणारे श्री चक्रधरस्वामी

—————————–

         घोडाचुडी संन्याशाचा शीष्य चाटनी भीक्षेला गेल्यावर एका बाईने गरम गरम अंबील त्याच्या हातावर वाढल्यामुळे त्याने त्या बाईचे घर जाळून आपला संताप व्यक्त केला व नंतर सबंध गावच जाळून टाकले. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींना त्या संन्याशाची ती हिंसावृत्ती आवडली नाही. व्यथित होऊन स्वामींनी त्याची साथ सोबत सोडून दिली. *नाशिक कुंभमेळ्यात* गोदावरी कुंडात आधी स्नान करण्याचा मान कुणाचा यासाठी आक्रमक होऊन परस्पराच्या अंगावर धावून जाणारे उग्र संन्याशी आखाडे नाशिक करांना माहिती आहेत. तर दुसऱ्या बाजूला – सुवर्ण, मानिक, मोती, ऐश्वर्य, नाकारून नम्रतेने, लीनतेने, सहनशीलतेने, डोई ओडवण्याचे आचरण करणारे व ईश्वराचे नामस्मरण करणारे महानुभाव पंथाचे साधू संत हा महाराष्ट्र पाहतोय. हे आचरण पाहूनच या महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकरी , कष्टकरी, आठरा पगड जातीतील लोक महानुभाव पंथाचे अनुयायी झाले आहेत. होत आहेत…

 ४. जिथे अहंकार असेल तिथे शांती कधीच नांदत नाही.

—————————–

      मग तो अहंकार धनाचा असेल, सत्तेचा असेल, कुळ श्रेष्ठत्वाचा असेल, जाती श्रेष्ठत्वाचा अथवा रंग रुपाचा असेल. जो या अहंकारातून मुक्त झाला त्याच्याच मागे हा समाज गेला. हीच भारताची संस्कृती आहे व या गोष्टीला इतिहास साक्षी आहे.

५.राज्य पद त्यागून भीक्षा मागणारे धर्म प्रवर्तक

—————————–

       समाजाच्या मनावर राजां पेक्षा दारोदार भिक्षा मागणाऱ्या भिक्षुचाच अधिक प्रभाव राहिला आहे. तीर्थंकर महाविर यांनी राज सत्तेचा त्याग करून हातात भीक्षा पात्र घेऊन भटकंती केली व जैन धर्माचा प्रसार केला. सिद्धार्थ गौतम बुद्ध राज्य वैभवाचा त्याग करून अरण्यात निघून गेले. हातात भिक्षा पात्र घेऊन भिक्षुक होऊन भटकंती केली व बौद्ध धर्माचा प्रसार केला. हजारो लाखो करोडो लोक आज या बौद्ध व जैन धर्माचे अनुयायी आहेत.

       आमचे परमेश्वर अवतार *सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी* हे गुजरात भडोच चे राजपूत्र होते. त्यांनी राज वैभवाचा ऐश्वर्याचा त्याग केला. महाराष्ट्रात रिद्धपूरला येऊन श्री प्रभूबाबांकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. सालबर्डीच्या पर्वतावर व विंझी गोंडवाडा या प्रदेशातील आदीवासी वनवासी अर्धनग्न लोकात राहिले. दीन दुखी सर्वसामान्य लोकांत मिसळून त्यांचा उद्धार केला. हीच स्वामींच्या कार्याची विशेषत: आहे.

६.अर्धनग्न गरीब लोकांत मिसळणारे धर्मप्रवर्तक श्रीचक्रधर

      —————————–

    800 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात देवगिरी, पैठण, नाशिक, वेरूळ ही ठिकाणे देवता धर्म मार्गाचे प्रमुख केंद्रे होती. येथूनच देवता धर्माचे नेतृत्व सबंध महाराष्ट्र प्रांतात होत होते. राजकीय व धन संपत्तीच्या ऐश्वर्याने सोन्याच्या सिंहासनावर बसून लोकांना आपला सांप्रदाय सांगणारे हेमाद्री, ब्रह्मसानू , महदाश्रमाची व पैठणच्या धर्ममार्तंडांची धर्मसत्ता तत्कालीन समाजात खोलवर प्रस्थापित झालेली होती. हे एका बाजूला तर दुसर्या बाजूला सुवर्ण, धन, संपत्ती, ऐश्वर्य याच्या पासून दूर राहून सामान्य अर्धनग्न गरीब लोकांमध्ये मिसळून त्यांच्याशी समरस होणारे, त्यांचे घरात भीक्षा मागणारे व त्यांचे सुख दुखे जाणून घेऊन त्यांना दुखातून मुक्त करणारे श्री चक्रधर स्वामी. लिनतेने, विनम्रतेने व ममतेने समाजाला आपले धर्माचे तत्व समजावून सांगणारे श्री चक्रधर स्वामी. जीवांचा उद्धार करण्याचे व्यसन अंगिकरलेल्या श्रीचक्रधरांकडे सामान्य गरीब कष्टकरी विचारवंत जिज्ञासू तत्वचिंतक पंडीत वर्ग वेधला व यातूनच अनुयायायी वर्ग निर्माण झाला. विनम्रता, लीनता व डोई ओडवण्याच्या प्रवृत्तीमुळेच सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींचे कार्य समाजात वाढत गेले. आज महानुभाव पंथाचे अनुयायी जे देशभर दिसत आहेत. ते विनम्रता, लिनता, सहनशीलता व डोई ओडवण्याचे आचरणातून निर्माण केला आहे. हे विसरून चालणार नाही.

७.सुवर्णांकित धर्मपिठे

—————————–

       त्यावेळचे पैठणचे धर्मगुरू सोन्याच्या सिंहासनावर बसून आपल्या धनाचे व श्रीमंतीचे ऐश्वर्य समाजावर लादत होते. सुख विलासात लोळत होते.जर कोणी आपल्या ऐश्वर्याला विरोध केला, आपल्या सांप्रदाया विरोधात जर कुणी बंड केले तर त्यांंना नदीत बुडविणे, त्यांचे ग्रंथ नदीत बुडविणे, शिरछेद करणे, अवयव छेद करणे, त्यांचेवर हल्लेकरणे, विष प्रयोग करणे या साठी पदरी बाहुबली ठेऊन ते समाजाला धाकात ठेवत असत.

         महानुभाव पंथाने निस्पृह, त्यागी, विनम्र व निरालंबी जीवनाचा पुरस्कार केला. धन संपत्ती धारण करण्यास व धन वैभवाचे प्रदर्शन करण्यात कधीही सहभाग घेतला नाही. विनम्रता, लीनता व डोई ओडवणे हा सद्गुण महानुभावांनी सतत जोपासला. त्यामुळेच महानुभाव पंथाची विजय पताका भारतभूवर डौलाने फडकत राहिली..

       आता काळ बदलला आहे. काहीजण धन संपत्तीच्या संग्रहाने वेगळ्याच दिशेने वाट चाल सुरू झाली आहे. नम्रतेची, लीनतेची, सहनशीलतेची व डोई ओडवण्याची पूर्वांपार चालत आलेली भूमिका काही जणांना कालबाह्य वाटू लागली आहे. हे अधपतनाचे संकेत आहेत.आरे ला कारे म्हणणारी आज प्रवृत्ती वाढत आहे. आजची ही स्थिती आहे. उद्या स्थिती काय असेल हे सांगता येणार नाही.

      महानुभाव पंथातील बलाढ्य संस्था जर सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींनी दाखविलेला विनम्रता, लीनता व डोई ओडवण्याचा मार्ग सोडून अहंकाराच्या, दांभिकतेच्या, ऐश्वर्याच्या रस्त्याने जातील तर त्या संस्था,आश्रमे, प्रथम राजकीय व्यवस्थेच्या टप्प्यात येतील, आधी मान सन्मान, नंतर धन संपत्तीचा संग्रह, नंतर त्या धन संपत्तीच्या वारसा हक्काचा वाद, नंतर राजकारण व नंतर त्या संस्थेचे पतन असा एकामागून एक चक्रव्यूहात अडकून पतन होण्यास वेळ लागणार नाही..

८.बहू रत्ना वसुंधरा

—————————–

ही भूमी रत्नांची खाण आहे. असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वआमींचे सूत्र आहे. धन वैभवाचे ऐश्वर्य प्रदर्शन करणारे हजारो लाखो लोक या पृथ्वीवर पडून आहेत. आपण काही ऐश्वर्य दाखविणारे एकटे नाहीत. म्हणून महानुभाव पंथाने धर्माचा प्रचार व प्रसार करताना धन ऐश्वर्य प्रदर्शनाच्या मागे न लागता विनम्रता, लीनता व ओडवण्याची भूमिका कधीही सोडू नये. त्यातच महानुभाव पंथाचे खरे सामर्थ्य लपलेले आहे.

       महंत श्री प्रज्ञासागरबाबा महानुभाव

      आर्चक, 108 कोटी नामस्मरण मंदिर

        खणेपुरी, मो.9850448501

Leave a Comment