What is the Sanyas?

The following is knowledge in the words of my Achyut Gotriya Mr. ई. से. Mr. Subhash Vishwasrao Pawar from Shreemad Bhagwat Geeta Dham, Pune.

🌹जय श्रीकृष्ण🌹

*षड्रिपू:-

काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू किंवा षडरिपू (सहा शत्रू) असे म्हणतात.

या भावनांमुळे मन अशांत होते. मन एकाग्र करण्यात यांमुळे अडचणी येतात.

1. काम म्हणजे मानवी मनात नित्य निर्माण होणाऱ्या इच्छा. मग त्यात लैंगिक भावना सुद्धा येतात.

2. क्रोध म्हणजे राग.(गुस्सा,चड़चिढाहट)

3. लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीचा हव्यास, मिळविण्याची इच्छा, अतीव प्रेम.(लालच)

4. मोह म्हणजे अज्ञानामुळे एखाद्या क्षणभंगुर गोष्टीशी मन संलग्न करणे, गुंतविणे.(आकर्षण,फळ आकर्षणामुळे कार्यरत)

5. मद म्हणजे गर्व, अति अभिमान. (घमंड, अहंकार)

6. मत्सर म्हणजे द्वेष, जळावू वृत्ती, दुसऱ्याची भरभराट, प्रगती सहन न होणे.(ईर्ष्या,जलन)

या सहा विकारांमुळे जे रोग उत्पन्न होतात त्यांना मानस रोग असेही म्हणतात. मानस रोग अर्थात मनुष्यास होणारे विविध आजार.

आपली जीवनरूपी नौका सुख:-दुखाच्या महासागरात वल्हवत असतांना आपल्याला चार प्रकारचे पुरुषार्थ अथवा कर्म करावे लागतात. यात धर्माप्रमाणे वर्तन करणे आणि सदाचारी–स्वविवेकी वागणे, अर्थार्जन करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवणे, काम आणि कष्ट याला प्राथमिकता देणे आणि कर्म व पुण्य करून मोक्ष प्राप्ती करणे. मात्र असा जीवनाचा प्रवास करत असतांना हे षड्रिपू आपल्या आयुष्याची नौका या सुख:-दुखाच्या महासागरात भरकटवण्याचे काम करतात. अशा प्रकारे हे षड्रिपू हे मानवी स्वभावाचे दुर्गुण अथवा दोष म्हणून काम करतात. या षड्रिपूचे प्रमाण आपल्या विचारात, स्वभावात आणि वागण्यात जास्त झाले की, आपण आपल्या स्वत:च्या आणि इतरांच्या मनातून उतरतो आणि सहकार्य आणि सहजीवन प्रक्रियेच्या बाहेर फेकले जातो. साहजिकच त्यामुळे या षड्रिपूंना जाणून घेणे आणि त्यांचा त्याग करणे अनिवार्य आणि आवश्यक ठरते.

पहिला रिपू काम असतो. काम म्हणजे भोग किंवा उपभोग घेणे होय. काम ही एक नैसर्गिक अशी भावना असून तिचा संबंध लैंगिक आनंद आणि प्रजनन सोबत जोडला जातो. असे असले तरी काम भावना एक व्यापक आणि विस्तारित दृष्टीने पाहिली जाणे आवश्यक ठरते. काम म्हणजे फक्त वासना नाही. तर जे काही आजूबाजूला आहे, त्याचा उपभोग घेणे बाबतची इच्छा होय. संसाधने आणि संपत्ती याचा उपभोग घेण्याची लालसा आणि इच्छा म्हणजे काम होय. मात्र आपण पाहतो कि ही संसाधने आणि संपती याचा अमर्याद वापर करण्याची वृत्ती दिसून येते. मानवी मनाला कामेच्छा होणे आणि त्याप्रमाणे होणारे वर्तन यासाठी काही सामाजिक आणि पारंपारिक नियमांनी आपल्याला बंधन घातले आहे. समाज आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती आणि घटक यांच्या मध्ये सदाचार आणि विवेक राहावा म्हणून धर्म अस्तित्वात आहे. प्रत्येक धर्माचे अनुयायी हे धर्माने घालून दिलेल्या नियमांचे काटकोरपणाने आणि कट्टरपणाने पालन करतात. साहजिकच काम, कामेछा याबाबत धर्माने, चाली, रितीरिवाज आणि परंपरा यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आपल्यावर बंधनकारक असते. त्यामुळे सामजिक आणि धार्मिक बंधने आणि स्व:नियंत्रण या आधारे आपण ज्यावेळी काम आणि कामेच्छा यावर नियंत्रण प्रस्तापित करतो, त्यावेळी आपण एक उत्तम आणि परिपूर्ण सामाजिक जीवन जगण्याकडे मार्गक्रमण करतो.

दुसरा रिपू म्हणजे क्रोध किंवा आपण त्याला राग असे ही म्हणतो. राग हा आपल्या इच्छा आणि अपेक्षा याच्याशी निगडीत असतो. राग हा आपल्या अपेक्षा जेंव्हा पूर्ण होत नाहीत, त्यावेळी निर्माण होतो. ज्यावेळेस आपल्या मनासारखे कोणीही वागत नाही, त्यावेळेस राग निर्माण होतो. अपेक्षा आणि समोर आलेली वस्तुस्थिती यात जेंव्हा अंतर वाढत जाते, त्यावेळी सुद्धा राग उत्पन्न झाल्याचे आपल्याला निदर्शनास येते. राग ही एक प्रबळ अशी नकारात्मक भावना असून ती मनाशी खोलवर निगडीत असते. रागाची तीव्रता ज्यावेळी वाढते त्या वेळी क्रोध जन्माला येतो. क्रोध ज्या वेळी उत्पन्न होतो, त्यावेळी तो फक्त मनाशी आणि विचारांशी निगडीत राहत नाही,तर तो शारीरिक आघात सुद्धा करतो. क्रोध हा वाढीस लागल्याने त्याचे परिणाम हे आपल्या शरिरावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर होतात. क्रोध हा फक्त समोरच्याला जाळत नाही तर त्याची झळ आपल्याला सुद्धा सहन करावी लागते. क्रोधात समोरचा व्यक्ती हा आपल्यापासून कायमचा दूर निघून जातो. त्यामुळे मानवी संबंधात रिक्त्तता तयार होते. ही रिक्तता वेळोवेळी जशी वाढत जाते, तशी त्याची मोठी पोकळी निर्माण होते. कालांतराने ही पोकळी एवढी मोठी होते की त्यातच आपण हरवून जातो. पुढे जावून मानसिक रुग्ण होण्याकडे सुद्धा आपली वाटचाल झाल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे क्रोध हा एक आपल्या स्वभावाचा शत्रू ठरतो. साहजिकच राग असो किंवा क्रोध हा वारंवार उत्पन्न होणे, हे आपल्याला अपायकारकच ठरते. साहजिकच राग कमी करण्यासाठी सकारात्मक राहणे, तात्काळ प्रतिक्रिया न देणे, अपेक्षा आणि वस्तुस्थिती यातील अंतर कमी करणे, आपल्या अवास्तव अपेक्षा इतरांवर न लादणे, आपल्या मनासारखे नाही झाले तर त्याबाबत राग न मानणे, सर्वांशी सदाचार ठेवणे, बोलण्यात नम्रता आणणे, हिंसेचा स्वीकार न करणे आणि दुसर्‍याला माफ करणे याबाबत आपल्याला दैनंदिन जीवनात विचारपूर्वक कामकाज करावे लागते. त्यासाठी आपल्या वर्तनात इष्ट असे बदल करावे लागतात. हळू हळू राग नियंत्रित करून आपण क्रोधापासून सुटका करून घेवू शकतो.

तिसरा रिपू लोभ असतो. लोभ ही एक मनाची इच्छा असून त्यात जे आपल्याकडे नाही ते आपल्याला मिळावे आणि जे आपल्याकडे आहे, त्यापेक्षाही अधिक मिळावे अशी तीव्र भावना यात असते. लोभ हा स्व:संचयाकडे लक्ष देतो, जे आजूबाजूला आहे, ते मलाच मिळाले पाहिजे हे लोभ दर्शवितो. लोभी मन आणि लोभी विचार हे व्यक्तिला अधिक दु:खी आणि निराश बनवितात. आपल्या जीवनात लोभ किंवा आपण ज्याला लालसा म्हणतो ही वाढीस लागली की जे तुमच्याजवळ आहे, त्याचीही गोडी आणि महत्व कमी होते. त्यामुळे आपल्या जवळ जे आहे त्याचे उपभोग मूल्य हे कमालीचे घटते. लोभ वाढला की आपली वैचारिक गोंधळ आणि वैफल्य ग्रस्तता वाढते. लोभी व्यक्ती कायम लोभ असलेल्या गोष्टी बाबत विचारमग्न राहत असल्याने त्याची कार्यक्षमता सुद्धा घटन्याकडे वाटचाल सुरू होते. लोभी मन हे अनेक नकारार्थी विचारांना जन्म देते. लोभी मन हे कट-कारस्थान आणि कपट या बाबत सुद्धा विचार करायला लागते. लोभ हा वाढला की शांतता जावून, त्या ठिकाणी अशांतता पसरते. अशी अशांतता आणि लोभ वृती ही आजूबाजूचे मानवी संबंधावर अत्यंत विपरीत असे परिणाम साधते. लोभ हा आपल्यातील एक मोठा दुर्गुण आहे, याबाबत संत, महात्मे आणि तत्त्ववेत्ते यांनी वेळोवेळी प्रहार केले आहेत.

चौथा रिपू म्हणजे मोह होय. मोह म्हणजे एखांदी गोष्ट अथवा बाब चांगली आहे की वाईट, चूक आहे की बरोबर, खरी आहे की खोटी याची खात्री न करता तिच्याकडे आकृष्ट होणे किंवा ती मिळवण्याची लालसा निर्माण होणे. मोह झाला की माणूस त्या गोष्टीकडे अथवा बाबीकडे आकृष्ट होतो. मोहामध्ये भुरळ पडते. चांगले वाईट यात भेद करणे मोहामध्ये शक्य होत नाही. व्यसनाकडे झुकण्याची पहिली पायरी म्हणजे मोह होय. मोह कधी कधी सर्वनाशाकडे सुद्धा घेवून जातो. आकर्षण आणि मोह यात भेद आहे. आकर्षण हे वाटते, मोह मात्र आकृष्ट करतो. मोह हा काही तरी मिळवण्याचा आणि काही तरी उपभोगण्यासाठीचा असतो. मोहातून निरंतर प्रेम उत्पन्न होत नाही, तर मोह हा तात्पुरता असतो. त्याची प्राप्ती झाली की तो कमी कमी होत जातो. तहान लागते त्याला तृष्णा असे म्हटले जाते, ती पाणी पिल्याने पूर्ण होते आणि माणूस तृप्त होतो. मात्र जर तेच मद्य असेल तर ते पिण्याचा मोह होतो. इथे मद्य पिणे धोकादायक आणि वाईट आहे. हे माहीत असूनही आपल्याला तीव्र स्वरूपाचे आकर्षण निर्माण होते. म्हणजेच मोह तयार होतो. मोह हा वैशिष्टपूर्ण आणि असाधारण बाबी विषयी असतो. जी बाब अथवा गोष्ट दूर आहे, तिचा मोह होत असतो. मोह हा पाण्यातील भवऱ्या सारखा असतो तो आपल्याला गीळगृत करतो. मोहापासून सुटका मिळविनेसाठी तुम्हाला आत्मपरीक्षण आणि आत्मशांती करावी लागते. समाधानाच्या एका सर्वसाधारण पातळीवर तुम्ही आले की मोहापासून सुटका मिळू शकते. यासाठी मोबाइल फोन हे एक उत्तम उदाहरण आहे. सर्व काही व्यवस्थित असतांना आणि मोबाईल फोनमध्ये सर्व सुविधा असतांना आपल्याला त्याच कंपनीचा बाजारात आलेला नवीन फोन घेण्याचा मोह होतो. त्यामुळे जुना मोबाइल कवडी मोल भावाने विकावा लागतो किंवा अडगळिला फेकावा लागतो आणि फक्त मोहापाई नवीन मोबाईल हा जास्त किमतीत घ्यावा लागतो. साहजिकच अशा प्रकारचे मोह टाळता येणे, एक चांगल्या वृत्ती आणि प्रकृतीचे लक्षण आहे. या मोहातून आपली सुटका करून घेण्याचे कसब आपल्या अंगी आपण जोपासले पाहिजे.

पाचवा रिपू म्हणजे मद होय. मद हा अहंकाराचे तीव्र स्वरूपाचे रूप आहे. याला आपण अती अभिमान आणि अती गर्व सुद्धा म्हणू शकतो. मद हा अती अभिमान मधून निर्माण होतो. स्व- संपती, स्व-स्थान, स्व-कीर्ती, स्व-शक्ती यातून अभिमान निर्माण होणे साधारण असले तरी यातून जेंव्हा टोकाचा अभिमान आणि तीव्र असा अहंकार निर्माण होतो, त्या वेळीच मद निर्माण होतो. मद हा एक वृत्ती दोष असून ह्यामुळे आपल्या सामाजिक जीवनात अनेक दोष निर्माण होतात. लोक तुमचे स्थान अथवा तुमच्याकडून काही तरी मिळेल, ही आशा घेवून तुमचा जयजयकार करत असतील. परंतु हे क्षणभंगुर राहते. कारण ज्यावेळी सत्ता आणि संपती लयास जाते, त्यावेळेस हेच लोक तुम्हाला सोडून निघून जातात. त्यामुळे सुद्धा मद जन्माला येतो. मद हा एवढा तीव्र असतो की त्यामुळे आपण काय करत आहोत, काय बरोबर, काय चूक याची चिकित्सा करता येत नाही. आणि आपण आपल्या तंद्रीत आणि जोशात राहतो. हा जोश एवढा प्रचंड असतो की त्यामुळे अनेक लोक आपला आदर करायचे सोडून देतात आणि त्यांचा मार्ग पत्करतात. त्यामुळे मद हा कधीही आणि केंव्हाही घातकच. त्यापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हाला विवेकी होवून इतरांचा आदर आणि सन्मान करावा लागतो.

सहावा रिपू म्हणजे मत्सर होय. मत्सर ही अशी वृत्ती आणि भावना आहे की यात आपण इतरांना मिळालेले यश आणि बाबी या त्याला का मिळाल्या? म्हणून त्याचा मत्सर केला जातो. दुसऱ्याची प्रगती होते, भरभराट होते, दुसऱ्याचा विकास होतो. त्यामुळे आशा प्रकारे कोणी प्रगती करत असेल, तर आपल्याला त्याच्याबद्दल मत्सर तयार होतो. यामागे निश्चितच प्रत्यक्ष त्याचे वैयक्तिक कष्ट आणि इतरांची अप्रत्यक्ष मदत असते, हे आपण जाणीव पूर्वक विसरतो. मत्सर हा आपल्या नाकर्तेपणाचे लक्षण असते, हे आपण लक्षात घेत नाहीत. आपण दुसऱ्याच्या ठिकाणी पोहचू शकत नाही किंवा दुसऱ्याने गाठलेल्या उंचीवर आपण पोहचू शकत नाही. यामुळे हा तयार होतो. मत्सर हा आपल्या मन आणि बुद्धी याच्या संयोगातून तयार होत असल्याने त्यातून आपणच जास्त नाउमेद होण्याची शक्यता असते. मत्सर हा तिरस्काराची पुढील भावना असल्याने मत्सरा मुळे आपल्या स्वत:चे भरमसाठ नुकसान होते. मत्सरा मुळे आपल्याला एकाकी वाटते आणि आपण मागे पडतोय याची भीती आपल्याला कायम खात राहते. मत्सर केल्याने त्याचे परिणाम समोरच्यावर न होता आपल्यावरही होतात.

समारोपात, श्रीमद्भगवद्गीते मधील खालील श्लोक येथे घेणे उचित ठरते. तो श्लोक असा आहे,

“त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः।

कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्।।

याचा स्वैर मराठी अर्थ असा की, काम, क्रोध आणि लोभ हे तिन्ही स्वभाव दोष हे नरकाचे द्वार आहे, त्यामुळे मन आणि आत्मा अशांत करणाऱ्या


या असुरी दोषांना आपण त्यागले पाहिजे. साहजिकच मानवी जीवनकार्य पूर्ण करत असतांनी काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूनां आपला स्वभाव, वागणे आणि वर्तन यातून हद्दपार करायला हवे.

 

*दंडवत प्रणाम🙏🙏*

*श्रीमद्भगवद्गीता धाम,,,,,,,,,,,,,✍🏻*

सुभाष विश्वासराव पवार

पुणे, महाराष्ट्र-४१२१०५.

 

*🌹जय श्रीकृष्ण🌹*

Leave a Comment