A great sculptor of the Mahanubhava sect Part 50-(A) Acharya Shri Nagarajvyas Kapate

The Great Sculptor of Mahanubhav Dharma

*!! महानुभाव पंथाचे थोर शिल्पकार !!*

 

*भाग:- ५०*

 

*’आचार्य श्री नागराजव्यास कपाटे ‘*

 

*’कविश्वर खामनीकर नागोव्यासानंतर कपाटे वैजनाथव्यास हे आचार्य झाले. यांची कारकीर्द शके १३८० ते १४१० पर्यंत होती. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य जायराजव्यास हे कवीश्वर गादीवर बसले. त्यांची कारकीर्द शके १४१० ते १४३० पर्यंत होती. त्यानंतर जायराजव्यासांचे शिष्य कपाटे नागराजव्यास हे सुमारे १४३१ मध्ये आचार्य गादीवर स्थानापन्न झाले.*

 

*’कपाटे नागराजव्यास हे अंतरगड येथील रहिवासी असून जातीने ब्राह्मण होते. त्यांना श्री जायराजव्यास कपाटे यांच्याकडून धर्मश्रवण होवून त्यांनी त्यांच्या नावे शके १४१५ मध्ये संन्यास घेतला. या वेळी परांडकर नागोव्यास विद्यमान होते. ते वृद्धापकाळामुळे गांधारी तळेगांव येथे रहात असत. त्यांची कारकीर्द ही शके १३५० ते १४२० पर्यंत होती.* 

 

*श्री परांडकर नागोव्यास हे एक महान तपस्वी आणि ब्रम्हविद्या शास्त्राचे जानकार होते,आणि त्यामुळे जायराजव्यासांनी नागराज व्यासांना शास्त्र अभ्यासण्यासाठी श्री परांडकर नागोव्यासांकडे पाठविले. परंतु श्री नागोव्यासांना फिनस रोग होता. तरी त्यांनी श्रीनागराज व्यासांची उत्कंठा पाहून शास्त्र सांगण्यास सुरुवात केली; परंतु शास्त्र सांगताना फिनस रोगामुळे त्यांना फार त्रास होवू लागला. म्हणून परांडकरांनी नागराजांना शिक्षण देण्याचे बंद केले. पण यात परंडकराचे मन समाधान नव्हते. उत्कंठीत शास्त्राभ्यासु विद्यार्थ्यांचे शास्त्राध्यन बंद झाले म्हणून ते म्हणाले, “तुम्हाला शास्त्राभ्यासाची उत्कंठा आहे, आवड आहे. यासाठी तुम्ही मल्ले महानुभावांकडे जा ! ” मल्ले हे परंडकरांचे गृहस्थाश्रमातील बंधू होते. तसेच या दोघांनीही खामनीकर नागोव्यासां कडून पंथीय शास्त्र अभ्यासले होते. म्हणून परंडकर नागोव्यासांनी मल्लेबासांना पत्र लिहिले. त्यात- ” नागराज हे अत्यंत योग्य असून यांना शास्त्राची अत्याधिक उत्कंठा आहे. तरी परीक्षा न घेता यांना शास्त्र सांगावे.” असे होते. हे पत्र श्रीनागराजव्यासाजवळ देवून त्यांना मल्लेबासांकडे पाठविले.*

 

*श्री परंडकरानी दिलेले पत्र वाचून मल्लेबासांनी नागराजांना ब्रह्मविद्याशास्त्राचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. श्रीनागराज बुद्धिमान व प्रज्ञावंत पुरुष होते. त्यांनी मल्लेबासांजवळून संपूर्ण शास्त्र आत्मसात केले. अभ्यासानंतर ते एका ज्ञानी विरक्ताकडून वैराग्याचे धडे शिकू लागले. हे ज्ञान पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली.*

 

*श्रीनागराज व्यास एकांक विधिची तपश्चर्या करीत असतांना ते पंचाळेश्वर भागात गेले. त्या वेळेस त्यांना वाटत असे की, आपणांस पुष्कळसे द्रव्य मिळावे, आणि त्यातून आपण साधूसंतांना अन्नदान, द्रव्यदान व वस्त्रदान करावे, आणि त्यांची सेवा करावी. तसेच श्री दत्तात्रेय प्रभूंचे एकदा तरी दर्शन व्हावे असे वाटत असे, त्यासाठी त्यांनी पंचाळेश्वर, येथील गोदावरी नदीच्या मध्यपात्रात श्री दत्तात्रेयप्रभूचे चरणांकित स्थान असलेल्या आत्मतीर्थांजवळ जाऊन अनुष्ठान करण्यास सुरुवात केली. तेथे असताना ते भिक्षा मागण्यासाठी राक्षसभुवन, पिपळगांव, बळेगाव येथे जात असत. आणि भिक्षा मागून आत्मतीर्थांजवळ भोजन करीत असत. भोजनाची वेळ सोडून इतर वेळी ते आपल्या उपासनेत मग्न असायचे. असेच, ते एकदा राक्षसभुवन येथे भिक्षा मागण्यासाठी जात असताना रस्त्यात त्यांना एक फकीर भेटला. तो म्हणाला,* 

 

*”अरे बाबा, कहाँ जाता है।”* 

 

*हे म्हणाले,* 

 

*” भिक्षेला जात आहो”* 

 

*तेव्हा तो फकीर म्हणाला,*

 

*”अच्छा ! हमारे लिये भी लाना.”* 

 

*’होय’ म्हणून श्रीनागराजवास भिक्षेला राक्षसभुवनास गेले. गावातून आपल्या आहारापुरते अन्न मागितले. आणि परत फिरले; तेव्हा तेथील एका ब्राह्मण गृहस्थी पुरुषाने क्षीर, तूप, दूध, साखर वगैरे उत्तम असे पदार्थ एका मनुष्यास पुरतील एवढे अत्यंत आग्रहपूर्वक वाढले. त्यांना वाटले, कोणीतरी अतिथी भेटण्यास येईल त्यासाठी हे अन्न आपणास न मागता मिळाले. अशी कल्पना करून त्यांनी ते अन्न घेतले. त्यानंतर ते पंचाळेश्वराच्या वाटेने निघाले. तोच फकीर आपणास परत भेटेल आणि त्याला हे अन्न खाऊ घालावे लागेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. पण त्यांनी तो रस्ता सोडून ते दुसन्या रस्त्याने जावू लागले. तेव्हा त्याही रस्त्यावर तोच फकीर पुन्हा भेटला. त्या फकीराला पाहून यांना भिती वाटली.*

 

*” हा माणूस काही कूडमंत्र करतो की काय !”* 

 

*परंतु तो फकीर म्हणाला,* 

 

*”क्या ! बाबा, डर गया”* 

 

*तेव्हा श्री नागराजवास म्हणाले,*

 

*” हाँ बाबा!”* 

 

*तो म्हणाला,* 

 

*”डरो मत, मेरे लिए तुमने भोजन लाया है” तो मुझे दे दो !* 

 

*त्यानंतर श्री नागराज व्यासांनी राक्षसभुवनाच्या गृहस्थाने आग्रहपूर्वक दिलेले सर्व अन्न फकिरास दिले व गंगेतून पाणीही पिण्यास आणून दिले. तो फकिर समाधानपूर्वक गंगेच्या काठावर बसून भोजन करीत होता, पण फकिराला भोजन दिल्याचे त्यांना समाधान नव्हते. आज आपणास अन्य भजन घडले म्हणून वाईट वाटत होते. फकिराच्या भोजनानंतर त्यांनी त्याचा निरोप घेतला. व पंचाळेश्वराकडे निघाले. थोडेसे अंतर चालून गेल्यावर त्यांनी मागे वळून पाहिले असता, तो फकिर त्यांना दिसला नाही. त्या वेळेस नागराजव्यासांना कल्पना आली की, केवळ माझा हेतू पूर्ण करण्यासाठी श्रीदत्तात्रेय प्रभूनी फकिराच्या वेषात म्हणजेच ऋषि वेषात मला भेट दिली, परंतु मी ओळखले नाही. यामुळे त्यांना अत्यंत वाईट वाटले. मग त्यांनी गंगाकाठी जावून भोजन केले. रात्री त्यांना स्वप्न पडले. साक्षात् श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना दर्शन दिले आणि सांगितले की,*

 

*”काल मी तुला फकिराच्या वेषात भेट दिली. तुझे जेवण मी केले. तुझे मनोरथ पूर्ण होतील. तू आता अनुष्ठान बंद करून अहमदनगर येथे जा ! तेथे मुधोपंत आहेत. त्यांना धर्मोपदेश दे ! ” एवढे सांगितल्यावर श्रीनागराज जागृत झाले. तेव्हा त्यांना समजले की, काल आपल्यासमोर जी घटना घडली, ती अत्यंत महत्त्वाची होती. आपण काल रस्त्याने येतेवेळी हेच अन्न साधू महात्म्याच्या उपयोगी गेले असते तर चांगले होते म्हणून तळमळ करीत होतो; दुःखी होतो, परंतु ही आपली चूक होती. मी फकिरास म्हणजेच श्रीदत्तात्रेय प्रभूस अंतःकरणापासून अन्न समर्पण केले नाही. पण परमेश्वराने माझ्यावर थोर कृपा करून मला भेट देवून माझे अन्न स्वीकार केले. असा विचार केल्यावर त्यांना एक प्रकारचा आनंद झाला आणि श्रीदत्तात्रेय प्रभूशी संभाषण झाले नाही, याबद्दल दुःखही वाटले.*

 

*श्रीनागराजव्यासांना श्रीदत्तात्रेयप्रभूनी सूचक दाखविले. त्याच वेळी नगरच्या मुधोपंतांनाही सूचक दिसले. मुधोपंतांना सूचक दिसण्यापूर्वी एक घटना घडली. ती अशी :,* 

 

*मुधोपंतांचा अत्यंत स्नेहातील एक किल्लेदार होता. त्याच्या घरी मुधोपंतांचे नेहमीच जाणे-येणे असे. तसेच त्यांच्या घरी पोथी पुराणही चाले एकदा एक पुराणिक श्रीमद्भगवद्गीतेचा अर्थ सांगत होते. श्रवण करण्यात मुधोपंत व इतर देशमुख पाटील आदि पुष्कळ लोक होते. श्रोतृवर्ग तन्मय होऊन ऐकत होता. त्या श्रोतृवर्गात एक जाणता महानुभावीय धर्मोपदेशी होता. त्यांने पुराणिकांना, ईश्वर स्वरूपाविषयी प्रश्न केला,*

 

*चैतन्याचिये खोल वाटे। पहाता वेदाची धात्र कुंडे । ते श्रीकृष्ण नेरे बोटे । कवण वर्ण जाणे। जियेचिये रोमरंध्रशाळे। हारतले अनंता ब्रह्मांड गोळकाची ढिसाळे । तिये शक्तिचे तरळले डोळे स्वरूप निहाळीता ।’*

 

*ही उद्धव गीतेतील ओवी म्हणून पाटील म्हणाले,* 

 

*’जेथे वेदाला परमेश्वर कळत नाही, मग तुम्हाला काय कळणार आहे.’ याचे उत्तर पुराणिकाला देता आले नाही. हा पाटलाचा संवाद ऐकून मुधोपंत त्या महानुभावीय धर्मोपदेशी गृहस्थाला म्हणाले,’* 

 

*तुम्हाला शास्त्राची माहिती कशी झाली ?’* .

 

*मग त्या गृहस्थाने महानुभाव पंथाचा उपदेश असल्याचे सांगून बराच वेळ त्यांच्याशी शास्त्र संवाद केला. त्यामुळे महानुभाव पंथावर मुधोपंतांची दृढ श्रद्धा बसली. तशात त्यांना रात्री स्वप्नही पडले त्यात साक्षात् श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्यांना सांगितले की, ‘नागराज महानुभाव येतील. त्यांचा तू उपदेश घे !’*

 

*त्यानंतर थोड्याच दिवसांत कपाटे नागराजव्यास हे पंचाळेश्वराहून नगरला आले, व ते नगरच्या बाहेर स्याहा डोंगरातील एका झाडाखाली स्मरण करीत बसले. तेव्हा नगर येथील मुधोपंत पालखीत बसून एका गावी जात होते, तेव्हा त्यांना नागराजव्यासांची तपस्वी मूर्ति दिसली. आणि पहाताच मुधोपंतास अत्यंत आदर वाटला. पालखीतून उतरून त्यांनी श्री नागराजांना नमस्कार केला.*

 

*मग मुधोपंतांनी श्री नागराज व्यासांच्या समोर एक सुवर्ण मोहोर दक्षिणा ठेवली. व त्यांना मागील वृत्तांत विचारला. यावर श्री कपाटेव्यासांनी आपला सर्व वृत्तांत सांगितला. त्यानंतर मुधोपंत म्हणाले,* 

 

*’मला श्रीदत्तात्रेयांनी स्वप्नात तुमचे नाव सांगितले आहे, तरी तुम्ही मला उपदेश द्या !’* 

 

*कपाटेव्यास म्हणाले,* 

 

*’स्वप्न सत्य असते काय ?’* 

 

*असे म्हणून त्यांनी उपदेश देण्याविषयी नकार दिला, परंतु मुधोपंतांनी अत्यंत आग्रह केल्यामुळे हे अधिकारी पुरुष आहेत, असे समजून त्यांना तेथेच धर्मोपदेश दिला. त्यानंतर या निमित्ताने मुधोपंतांनी एक मोठा समारंभ आयोजित केला. त्या प्रसंगी श्री नागराजबासांची भद्रासन रचून सुवर्णाने पूजा केली. उत्तम उंची वस्त्रे अर्पण केली. त्यानंतर त्यांची ब्रह्मविद्याशास्त्रविषयीची आवड पाहून कपाटेव्यासांनी त्यांना ब्रह्मविद्याशास्त्राचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. मुधोपंतही काळजीपूर्वक आवडीने सूत्रपाठार्थाचा अभ्यास करू लागले.*

 

*श्री कपाटेव्यासांचे वास्तव्य वनातच असल्यामुळे मुधोपंतांना तेथे जावे-यावे लागत असे. तेव्हा मुधोपंत कपाटेव्यासांना म्हणाले, “असे दररोज जाणे-येणे होत नाही, याकरिता महानुभावांनी गावात वास्तव्य करावे.” मग त्यांच्या विनंतीवरून कपाटेव्यास मुधोपंतांच्या घरी जाऊन राहिले. मुधोपंत हे गर्भ श्रीमंत ! त्यांना बादशहाकडून बारा गांवे इनाम म्हणून मिळाले होते. त्याचे महसूल उत्पन्न भरपूर येत असल्याने द्रव्याला काही कमी नव्हती. मुधोपंतांनी दररोज एक होन सोन्याचे नाणे श्रीगुरूला अर्पण करावयाचे, असा नियम केला. आणि यानंतर जे द्रव्य मिळेल ते श्रीगुरूंचे होईल म्हणून श्री कपाटेव्यासांपुढे प्रतिज्ञा करून दंडवत घातले.* 

 

*प्रतिज्ञेप्रमाणेच ते करीतहि असत. मुधोपंतांजवळ पंधरा मण, पुणेरी सोने होते. त्यातील आपल्या पत्नीला व पुत्राला हिस्सा देऊन आपल्या हिश्याचे सोने त्यांनी श्रीकपाटेव्यासांना अर्पण केले. या द्रव्यातून कपाटेव्यास आलेल्या अतिथींना पक्वान्नाचे भोजन देत असत.*

 

*श्री कपाटेव्यासांच्या धर्मप्रचारामुळे त्यांचे पुष्कळ शिष्य झाले. ते सर्व शिष्य त्यांच्याजवळच राहत असत, तसेच इतर पंथीय साधू महात्मे पण शास्त्र अभ्यासण्यासाठी यांच्या सान्निध्यात आले. त्यामुळे मुधोपंतांच्या आवारी पंथीय साधू महात्म्यांचा मोठा समुदाय जमा झाला. या सर्वांना तेथे राहण्यास जागा अपुरी पडू लागली, म्हणून मुधोपंतांनी त्यांना दुसरी स्वतंत्र जागा बांधून दिली. मग श्री नागराज व्यास आपल्या शिष्य मंडळींसहित तेथे राहू लागले.*

 

*मुधोपंत जसे द्रव्याने व धार्मिक भावनेने श्रेष्ठ होते, तसेच ते वैद्यकलेत हि श्रेष्ठ होते. मुधोपंतांच्या वेळी नगरचा जो बादशहा होता, त्याला कोणता तरी रोग झाला. त्याने रोगमुक्त होण्यासाठी अनेक उपचार केले. परंतु रोग बरा झाला नाही. शेवटी मुधोपंताला बादशहाने निरोप पाठविला. त्याप्रमाणे मुधोपंत तेथे गेले. मुधोपंतांनी राजाची नाडी पाहून औषध दिले. त्यांच्या रामबाण औषधामुळे राजाचा रोग बरा झाला. यामुळे राजा व राणी मुधोपंतावर संतुष्ट झाले व त्यांनी त्यांचा मोठा सत्कार केला. आणि ताट भरून सुवर्ण मोहरा दिल्या. त्या सर्व मोहरा मुधोपंतांनी श्रीगुरूस अर्पण केल्या. असे हे महान् त्यागी व गुरुश्रद्धेचे पुरुष !*

 

*मुधोपंत दररोज शास्त्राध्ययन करावयाचे, आणि संसारही चालवावयाचा असे थोर कीर्तिमंत व उदारशील होते. या यजमानाच्या घरी श्री कपाटेबास असताना एक संकट त्यांच्यावर गुदरले.* 

 

*नगर येथील एका ब्राह्मणाने श्री कपाटे महानुभावांच्या नावे संन्यास घेतला होता. परंतु पुढे त्याने संन्यास वेष टाकून पुन: गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. तो ब्राह्मण आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी काही द्रव्य कपाटेव्यासांना मागू लागला. पण यांनी त्यास द्रव्य दिले नाही, त्यामुळे त्याला राग आला. रागास्तव यांचा सूड उगवावा म्हणून त्या द्वेष्टया ब्राह्मणाने बादशहाजवळ सांगितले की मुधोपंतांचे गुरू एकांतांत बसून मंत्रसिद्धी करतात, त्या मंत्राच्या बळेकरून तुमचे राज्य बळकविण्याचा त्यांचा विचार आहे.*

 

*हे ऐकून बादशहा स्वतः सत्या-असत्याची परीक्षा करण्याकरिता मुधोपंतांच्या घराकडे गेला. तेव्हा त्याला मुधोपंत व त्यांचे गुरू एकांतात बसलेले आढळले. यावरून राजाची खात्री झाली की हे खरोखरच माझे राज्य बळकावण्यासाठी एकांतात बसून मंत्रसिद्धी करीत आहेत. वस्तुतः जसे दिसते तसे नसते. या गुरू-शिष्याची एकांतात बसून शास्त्रीय चर्चा चालत असे. परंतु राजास या धर्मपतित ब्राह्मणाने मत्सरापोटी खोटे सांगितले, ते राजास खरे वाटले.*मग राजाने आपल्या सैनिकांना सांगितले की,*

 

 *”मुधोपंतांच्या गुरूला धरून आणावे” त्याप्रमाणे सैनिकांनी श्री कपाटेव्यासांना अटक करून राजाकडे नेले. नंतर मठात एकच हाहाःकार झाला. तेथे कुमर आम्ना- याचे श्री गोपाळव्यास भिंगारकर होते. ते राजदरबारात गले. तेव्हा श्री कपाटेव्यासांना राजाज्ञेप्रमाणे सैनिक डागणी देत होते. ते पाहून भिंगारकर महंत कपाटेव्यासांच्या अंगावर पडले, आणि बादशहाला म्हणाले,* 

 

*’यांना डाग देऊ नका ! मला द्या !’ तुम्हाला समजले, तसे आम्ही कार्य केलेले नाही, कुजांत्र करणे हे आमच्या शास्त्रात नाही, हे खरे करून दाखविण्यासाठी भिंगारकरांनी श्रीमद्भागवत व गीताग्रंथ बादशहाला वाचून दाखविला. शिवाय श्रीचक्रधरस्वामींचे लीळाचरित्र, सूत्रपाठही वाचून दाखविला. यावरून या महानुभावांनी कुजांत्र केलेच नाही, अशी राजाची खात्री पटली व राजाने श्रीकपाटेव्यासांना शासन करण्याचे बंद केले. मोठा आदर सत्कार करुन घरी जाण्याची परवानगी दिली.* 

 

*यानंतर राजाने खोटे सांगणाऱ्या ब्राह्मणास आपल्या सैनिकांद्वारा धरून आणले, व ‘श्रीकपाटेव्यासांना जी शिक्षा दिली तीच याला द्या !’ अशी राजाने सैनिकांस आज्ञा केली. तेव्हा भिगारकरांनी त्याला असे न करण्याबद्दल राजास विनंती केली. आपण जर असे कराल तर आमचे सर्व तप पाण्यात जाईल. अपराध करणाराला शिक्षा न देता सोडून दिले, तर आमच्यावर तुमचे थोर उपकार होतील. भिंगरकराच्या या विनंतीवरून बादशहाने त्या ब्राह्मणास सोडून दिले.*

 

*हा प्रकार घडल्यानंतर श्री कपाटे नागराजव्यासांचे तेथे मन रमेना. त्यांनी आम्ही येथून जातो, असे मुधोपंतांना सांगितले. आणि ते आपल्या सर्व मार्गमंडळींसहित तेथून निघाले व क्रमवशे पायी प्रवास करीत करीत पैठणला आले, येथे आल्यानंतर त्यांनी सर्व पैसा धर्मकार्यात खर्च केला. एकंदरीत त्यांचा हेतु श्रीदत्तात्रेयप्रभूच्या वरप्रसादाने पूर्ण झाला.*

 

*यानंतर ते पुन्हा परत पैठणहून मुधोपंतांच्या भेटीस नगरला गेले त्या वेळी इतर भिक्षुक महात्मे मंडळीहि तेथे आली. ती पाचसात दिवन राहून निघून गेली. फक्त त्यांच्याजवळ मुरारीमल विद्वांसच राहिले. हे दोघे पावसाळ्याचे चार महिने नगरला होते. पावसाळा संपल्यावर श्रीविद्वांस, एकांकी अध्ययन करण्यास निघून गेले. मग श्रीकपाटेव्यासांच्या सान्निध्यातील मंडळी त्यांच्याजवळ राहाण्यास आली. ते या मंडळीसहित नगरला बरेच दिवस होते. येथे असताना त्यांच्यावर आणखी एक संकट चालून आले.*

 

*त्याच्यातील काही महानुभाव मंडळींना सरकारी कर्मचा-यांनी हे गुप्तचर आहेत म्हणून धरले, व त्यांना खूप त्रास दिला. या परिस्थितीमुळे श्री कपाटेव्यास हे तेथे न रहाता आपल्या मंडळींसहित पुणे प्रांताकडे निघून गेले. एकंदरीत श्री कपाटे व्यासांनी आपले सर्व आयुष्य हे परमार्ग सेवेत व ब्रम्हविद्या ज्ञान शिकविणे, अन्न व द्रव्य दान करणे यातच घालविले. त्यानी आपले शेवटचे दिवस पुण्याजवळील ‘चाकण’ येथे व्यतित करून तेथेच सुमारे शके १४८० मध्ये इहलोकीची यात्रा संपविली.*

 

*क्रमश:–* 

 

*’नमस्कार माझा या थोर महानुभावा…!!* 

 

*परमार्ग सेवार्थ,* 

 

*श्रीमद्भगवद्गीता धाम,,,,,प.से✍️,* 

सुभाष विश्वासराव पवार.

मो.नं. 9920653774

पिंपरी-चिंचवड,पुणे, महाराष्ट्र. 

 

*!!! जय श्रीचक्रधर !!!*

Leave a Comment